सिल्लोड, (प्रतिनिधी) : पालोद (ता. सिल्लोड) येथील खेळणा मध्यम प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी आज माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचाहस्ते आवर्तन सोडण्यात आले. प्रारंभी आ. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते खेळणा मध्यम प्रकल्पात जलपूजन करून कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. खेळणातुन आवर्तन सोडण्यात आल्याने रब्बी पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
खेळणा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने यावर्षी सप्टेंबर अखेरच खेळणा मध्यम प्रकल्प ओव्हरफलो झाला होता. आज मितीला खेळणा धरणात ८१ टक्के जलसाठा आहे. त्याअनुषंगाने सिंचनासाठी आरक्षित पाण्याचा विसर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आ. अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्याची अंमलबजावणी आज करण्यात आली. खेळणा मध्यम प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आल्याने यामुळे २ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येवून रब्बी पिकांना लाभ होणार आहे. शिवाय परिसरातील विहिरींनाही फायदा होणार असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बीतील उत्पन्नात वाढ होईल असा विश्वास आ. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
या गावांना होणार फायदा ;
खेळणा मध्यम प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आल्याने तालुक्यातील, पालोद, मंगरुळ, दहेगाव, अन्वी, डोंगरगाव, तर भोकरदन तालुक्यातील आव्हाणा, सुभानपुर, मालखेडा येथील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शेतकऱ्यांना किमान तीन वेळा आवर्तन सोडण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करा असे निर्दे श आ. अब्दुल सत्तार यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा जेणेकरून धरणातील पाणी साठा वाढेल असे आ. अब्दुल सत्तार म्हणाले.
धरण क्षेत्राची सीमा निश्चित करणे, धरणाच्या पाळू वरील झाडे झुडपे काढणे, कालव्याचे काँक्रीटीकरण करण्याबाबत प्रस्ताव सादर करणे, याबाबत आ. अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना निर्देशित केले. याप्रसंगी सेवानिवृत्त विभागीय निबंधक देविदास पालोदकर, माजी सभापती रामदास पालोदकर, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता प्रीतम राठोड, कॅनॉल निरीक्षक सोमनाथ ताठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयराम चिंचपुरे, राजेंद्र ठोंबरे, मधुकर गवळी, निजाम पठाण, शंकरराव खांडवे, नाना पांढरे, गुलाबराव मिरगे, प्रभाकर बन्सोडे, वकील पठाण, शेख मोईज, अशोक पालोदकर, संजय डमाळे, विश्वास जंजाळ, कल्याण डवणे, अंकुश पाटील, मधुकर मिरगे, शिवाजी बर्डे, निखिल पालोदकर आदींसह गावकरी, परीसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.















